यवत: गोमंत साई सेवक वारकरी समिती यांच्या वतीने श्री राष्ट्रोळी साई मंदिर, सांगोल्डा, बार्देश गोवा येथुन दरवर्षी गोवा ते श्री क्षेत्र शिर्डी अश्या पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. दि. २ जानेवारी रोजी प्रस्थान केलेल्या श्री साई पालखीचे आज दौंड तालुक्यात श्री साईचरण सेवा मंडळ यवत यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आज साई साई हरे हरे, साई राम हरे हरे या नाम घोषात माध्यांन्ह आरतीसाठी पालखी सोहळा देऊळगाव गाडा येथील अमन ढाबा येथे विसावला. साईबाबांच्या नाम घोषाने भक्तिमय वातावरणात परिसर न्हावुन निघाला होता. संपूर्ण जगातील अनेक नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा येथे जात असतात परंतु गोवा येथील शिर्डी माझे पंढरपूर मानणारे अनेक साईभक्तांनी नववर्षाचे स्वागत करून दुसऱ्याच दिवशी शिर्डीची वाट धरली आहे. सुपे घाट पार करून पालखीचे दौंड तालुक्यात आगमन झाले व सोहळा देऊळगाव वाडा येथे विसावला आहे.
यावेळी श्री साईंच्या पालखीसह पादुकांची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती, यावेळी श्री शिवसाई भजनी मंडळ यांच्यावतीने भजनांचा कार्यक्रम पार पडला व माध्यांन्ह आरती करण्यात आली. यावेळी श्री साईभक्त परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. काहीकाळ साई सेवकांनी विश्रांती घेत श्री साई दर्शनाची आतुरता असलेले जवळपास १५० साईसेवकांनी साईंचा जय जयकार करत श्री क्षेत्र शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले.
२ जानेवारी रोजी गोवा येथून निघालेले पदयात्री जवळपास ६०० कि.मी अंतर असलेला पालखी सोहळा १७ जानेवारी रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार असुन पालखी सोहळ्यात गोवा राज्यातील अनेक भागातील साईसेवक सहभागी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.यावेळी विजय दोरगे, निलेश शेंडगे, संजय कुंजीर, शैलेश गुंजभारे , मयूर वचकल, सनी शहा, गणेश राजपूत, मोहन कदम, पप्पू डोंबे यांसह यवत, तांबेवाडी व दौंड तालुक्यातील अनेक साईभक्त उपस्थित होते.