पुणे: पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत थेऊरफाटा येथे एक दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 138 नव-कुक्कुटपालक शेतकरी उद्योजकांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत विविध कुक्कुटपालन योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कुक्कुटपालनाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पक्ष्यांचे संगोपन, खाद्य व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.

या प्रशिक्षण शिबिराला आमदार ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य अमोल टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जी. बी. चौधरी, थेऊरचे माजी उपसरपंच भरत कुंजीर, स्वप्नील कुंजीर, रूपचंद बोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पशुपालन आणि कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. अशा व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील आणि ग्रामीण भागात पशुधनावर आधारित उद्योगांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि आयोजकांचे कौतुक केले.






