यवत / राहुलकुमार अवचट : उरुळी कांचनजवळील डाळिंब (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कारवाईत यवत पोलिसांनी ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाची अफूची हिरवट रंगाची बोंडे व पाने असलेली झाडे जप्त केली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला अटक केली. अनिल बबन म्हस्के (वय ४२, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ३८ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील डाळिंब येथे अफूची अवैध लागवड केल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. 09) पोलिसांनी छापा टाकला असता जमीन गट नं १७४ मध्ये आठ गुंठे पुदीनाचे क्षेत्रामध्ये काही अंतरावरील ६ सरीमध्ये सुमारे ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाची अफुची हिरवट रंगाची बोंडे व पाने असलेली झाडे दिसून आली. याप्रकरणी यवत पोलिसांनी डाळिंब येथील एकास अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाचा २ लाख ३८ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कामगिरी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार अक्षय यादव, निलेश कदम, महेंद्र चांदणे, राम जगताप, नारायण वलेकर, पोलीस नाईक आव्हाळे, मारूती बाराते यांच्या पथकाने केली.