गणेश सुळ
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड ,हवेली बारामती, शिरूर, इंदापूर अशा अनेक तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरविले जात आहे. या घटनांची नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्याबद्दल अनेक तक्रारीनंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अवैधरीत्या ड्रोन फिरविणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी त्यांनी ‘अँटी ड्रोन गन’ खरेदीसाठी जिल्हा नियोजन विकास महामंडळाकडे प्रस्ताव देखील सादर केला आहे.
त्यामुळे रात्रीच्या अवैध ड्रोनच्या घिरट्या रोखण्यास मदत मिळणार आहे. दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खोर, खामगांव या गावामध्ये रात्री आणि दिवसा देखील चोरीचे प्रकार घडत असतात. आता त्यातच रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
काही तरुणांनी दुचाकीवरून या ड्रोनचा पाठलाग देखील केला. परंतु अशा वेळी अचानक ड्रोनचे लाईट बंद होत असल्याने नागरिकांचा संशय बळावला आहे. या सर्व घटनेच्या उपयोजनाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण पोलिसांकडून विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस घिरट्या घालणाऱ्या या अवैध ड्रोनचा लवकरच उलगडा होईल. ही अपेक्षा आहे.