ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी येथील गरीब कुटुंबातील आणि मोलमजुरी करून पोट भरणारे विजय ज्ञानोबा धोत्रे यांच्या दोन मुलींचा अपघात निमगाव म्हाळुंगी-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर झाला होता. वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाल्याने या घटनेत त्यांच्या दोन्हीही मुली जखमी झाल्या होत्या, परंतु त्यातील एक मुलगी गंभीर जखमी झाली असल्याने त्यांच्या कुटुंबियां पुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता.
यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांनी विजय धोत्रे यांना व त्यांच्या कुटुंबियांना फोन करून आम्ही सर्व माजी सैनिक तुम्हाला आर्थिक मदत करणार आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. अशा स्वरुपाचा आधार दिल्याने धोत्रे कुटुंबियांना धीर मिळाला.
शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे ,माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण आणि सर्व आजी माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या शुभहस्ते धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे, सुरेखा धोत्रे, भावना दौंडकर यांच्या कडे एकूण 65 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. यावेळी धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे व त्यांच्या कुटुंबियांनी सैनिक संघटनेच्या सर्व माजी सैनिकांचे व संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण व निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले. बापूसाहेब काळे यांनी जय जवान माजी सैनिक संघटनेचे कौतुक केले
सदर मुलींचा अपघात घडलेल्या ठिकाणी वेळोवेळी अपघात घडत असतात. त्यामुळे वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेतली नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा सरपंच बापूसाहेब काळे यांनी निषेध व्यक्त करून लवकरात लवकर सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच बापूसाहेब काळे यांनी केली आहे.
यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे सुभेदार बाळासाहेब घोलप, हवालदार लक्ष्मण शिंदे, हवालदार मारुती चौधरी, हवालदार अंकुश काळे, हवालदार लक्ष्मण कुसाळे,हवालदार आनंदा पवार, हवालदार सुनील चव्हाण, हवालदार बाबा मराठे, हवालदार संजय पाटील तसेच मोठया प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.