उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असताना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) यावर मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. थेऊरसह परिसरातील 13 गावांसाठी (14 ग्रामपंचायती) अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास (PMRDA) प्राधिकरनाने मंजुरी दिली असून, यासाठी तब्बल 10 एकर गायरान जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पामध्ये थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोलवडी या गावांचा समावेश आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना PMRDA चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन सन 2043 मधील संभाव्य गरजांनुसार हा प्रकल्प डिझाइन करण्यात आला आहे. प्रतिदिन 150 टन (TPD) कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची असेल.

प्रकल्प स्थळापासून 20 किलोमीटरच्या अंतरातील ग्रामपंचायती या प्रकल्पात सहभागी होऊ शकतील. आपापल्या भागातील कचरा संकलित करून तो प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची असेल. जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी निश्चित केलेली ‘टिपिंग फी’ ग्रामपंचायतींना PMRDA कडे जमा करावी लागेल. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आपापल्या मासिक किंवा ग्रामसभेत मंजुरीचा ठराव पास करून PMRDA कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. PMRDA च्या या उपक्रमामुळे हवेली तालुक्यातील पूर्व भागाला कचरामुक्त होण्यास मदत होणार असून परिसराचा कायापालट होणार आहे.






