पुणे : मानदुखीपासून आराम मिळावा म्हणून इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगचा वापर करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगावशेरी परिसरात उघडकीस आली आहे. सोमनाथनगर येथे राहणारा 30 वर्षीय आयटी अभियंता रोहन कुबडी हा आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करताना घ्यावयाच्या खबरदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रोहन हा अविवाहित असून तो एकटाच राहत होता. सुमारे 3 महिन्यांपूर्वी तो सोमनाथनगर येथील इमारतीत राहायला आला होता. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या खोलीचे दार बंद असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले. त्यानंतर खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांना संशय आला. त्यांनी रोहनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोनला प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर घरमालकाने खोली उघडली असता रोहन बेडवर मृतावस्थेत आढळला. हे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
माहिती मिळताच चंदननगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, रोहनच्या मानेत दुखत असल्याने त्याने आराम मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगचा वापर केला असावा. ही पिशवी मानेखाली ठेवून तो झोपला असताना विजेचा धक्का बसला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.







