सोलापूर : उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीचा तेथील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होती. याचदरम्यान रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर तरुणीने आपल्या नातेवाइकांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रुग्णालयासारख्या ठिकाणी उपचार घेत असताना असा प्रकार घडल्याचा आरोप समोर आल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी रुग्णालयातून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विविध पथके त्याच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.






