यवत: दौंड नगरपालिका हद्दीत कत्तलखान्याचे काम सुरु असून या कत्तलखाने विरोधात विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कत्तल खाण्याची परवानगी रद्द करणेबाबत मागणी केली आहे.
दौंड नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेत बांधकाम सुरु असलेल्या कत्तलखान्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कत्तलखान्याचे बांधकाम पाडण्याबाबत योग्य ते कायदेशीर आदेश द्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बारामतीचे जिल्हा अध्यक्ष गणेश आकडे यांनी केली. सदर जागेत कत्तलखान्याचे बांधकाम ३ मार्च २०१८ पासुन सुरु आहे. कत्तलखान्याच्या उत्तरेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामि गंगा योजनेतील भीमा नदी आहे. पुढे ही नदी अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या सिध्दटेक या देवस्थानाजवळुन जाते.
तसेच हीच भीमा नदी नरसिंगपुर देवस्थान या ठिकाणी त्रिवेणी संगमातुन जात पुढे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुर येथे चंद्रभागा नदीत रूपांतरीत होते. पुढे ती तीर्थक्षेत्र अक्कलकोट व गाणगापुरला जाते. भविष्यात कत्तलखान्याच्या साफसफाईमधुन निघणारे मांसमिश्रीत रक्त व इतर टाकाऊ पदार्थ नदीत मिसळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हिंदु धर्मीय व वारकरी संप्रदायाचा उद्रेक होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
तरी दौंड नगरपरिषद हददीतील शासकीय जागेत सुरु असलेल्या कत्तलखान्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कत्तलखान्याचे बांधकाम पाडण्याबाबत योग्य ते कायदेशीर आदेश देण्यात यावेत. अन्यथा हिंदुधर्मियांचे व वारकरी संप्रदायाचे मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.