दौंड : दौंड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ ते रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लिंगाळी गावच्या हद्दीत मंगेश मेमोरियल हायस्कूल समोरील मोकळ्या जागेत घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल सुभाष साळुखे (वय-33 वर्ष) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत तेजश्री अमोल साळुखे यानी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार संतोष शिंदे यांनी सांगितले की, हा खून नक्की कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत. दरम्यान, दौंड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात लूटमार खून या घटना गेल्या पंधरा दिवसात वाढलेल्या आहेत.