Monsoon News शिरूर : गूबूsss गूबूsss गूबूsss पाऊस पडेल का? नंदीबैलान मान हलवावी तस ढोलक बदडवत नंदीबैलवाल्याने अंगात घातलेला मळका कोट उंचावत पडेन म्हणतोय…पडेन म्हणतोय…असे ओरडत सांगाव. (Monsoon News) तसा नंदीबैल पहायला आलेल्या पोरांचा गलका व्हायचा. सुवासीनी शेर आठवा धान्य काय ते नंदीबैल मालकाच्या झोळीत टाकायची. बळीराजा देखील खिशात काय असेल ते आठआणे नाहितर चार आणे त्याच्या हातावर टेकवायचा. (Monsoon News) कारण त्याला त्याच्या भाकीतावर पुर्ण विश्वास असायचा. (Monsoon News)
खळ धन…धान्यांन भरू दे… असा आर्शीवाद मिळावा
पाऊसाच्या सरी बरसतील शेत शिवारात पेरणी होऊन हिरवगार पिकाच लेण अन सोन्यावाणी मिळणार धान्य या आशेवरच त्याच जीण असायच. खळ धन…धान्यांन भरू दे… असा आर्शीवाद मिळावा. तुला देखील परत पसा भर धान्य घालीन. असा विश्वास या दोघांमध्ये दिसायचा. या विश्वासाच्या प्रेमान पाऊस देखील भरभरून बरसायचा.
लग्नसराई संपली की शेतमशागतीच्या कामाला सार कुटूंब जुपायच.वळीवा न मनावर घेतल की नांगरट केलेल्या शेतात ढेकळ फुटायची. हवेत गारवा निर्माण होऊ लागला की सुर्याच्या मावळतीच्या दिशेने काळे काळे ढग आभाळ भरून वाहू लागायचे. मृगाच्या सरी बरसू लागल्या की, सगळीकडे आनंदी आनंद व्हायचा. पाबर, मोघ, फण, फारूळे, वस्व, बांबूच्या नळ्या, चाड, चाडदोर, एढण, जू, शिवळ्या, जोती, फराट, रूमण या साहित्यांनी एकजूच व्हायची.
बैलांच्या गळ्यातील घुंगरांनी ताल धरावा तस औजारांनी बैलगाडी भरायची भल्या सकाळीच शेताकडे निघायची. खंड्याने सगळाच भार आपल्या खांद्यावर घेऊन निघण्याचा आव आणित भू sssभूsss करत बैलगाडीच्या खालची वाट धरायची. गावात कोण भी दिसायच नाही. बैलांच्या सोबतीन शेतावर राबणारे हात अन इंजीनियर ला देखील फिक पाडाव अशी शेत जमीनीची लागवड अन पेरणीची आखणी होत असे.
पाऊस तारांबळ करेल म्हणून कूटंबाचा राबता व्हायचा. कौल शेकारून निघायची, जनावरांचा चारा झाकायला गोण्यांच तळवाट तयार व्हायच. घरा जवळच असणारा शेणाचा उकिंडा शेतात जाऊन पडायचा. पावसात सगळीकडे ओलावा तयार होईल. यासाठी काड्याकुड्या गोळा केलेल सरपान अन शेणकुराच खांड पडवीला एका बाजूला पडायच. कुटूंबातल सगळी माणस कशी कामाला लागायची.गुराढोरांना पाऊस लागू नये म्हणून पाचटाच सपार निट करून घेतल जायच.
घरात वय झालेल म्हतार माणूस देखील घरातील लहान चिल्या पिल्यांना जवळ घेऊन बसायची. मग त्यातच त्यांच्या काळातील गोष्टींना…रंगत चढायची. धोsss धोsss पडणारा पाऊस अन ओढ्या नाल्याला आलेला पूर आवर्जून सांगितला जायचा. काळ काळ ढग आणि शेतशिवारावर नाचणारा मोर त्यातून मध्येच कोकिळेने आळविलेला सुर देखील गाऊन आजी लहानग्यांना झोपवित असायची. कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नावर हशा करून सरबत्ती व्हायची.
पावसाच्या वातावरणात मध्येच कडाडलेल्या विजेमुळे घाबरलेल्या अवस्थेत आईच्या कुशीत घुसलेली मुल पहावयाला मिळायची. या वातावरणातील देखील मडक्यात ठेवलेली बियाणे बाहेर काढली जायची. कारण का्ळ्याभोर जमिनीआड सोन्या सारख बियाण दडवल तरच उद्याच्या काळातील भाकरी ची काळजी मिटणारी असायची. राबत असणारा कर्ता पुरूष अन त्याच्या सोबत घरातील स्त्री पुरूषान त्याला कामाचा पाठिंबा द्यायचा. अशीच काय ती परिस्थिती असायची.
थंडगार वातावरणात राबणारी माणस अन दुपारच्या न्याहारीला झाडाच्या सावलीत एकोप्यान रिंगन करून जेवनावळीचा आनंद लुटणारी दिसायची. खरिपातल्या बाजरीच्या पेरण्या म्हणजे वर्षभराची चंदी असायची. त्यामुळे मागच्या वर्षी ठेवलेल बियाण खुप कामी यायच. त्यातून बैलजोडी वरच्या साथीन कारभाऱ्यांन बाजरीची पेरणी करावी. तर धन्याला साथ देण्यासाठी मोघ्यातून कडधान्य मातीआड कारभारणीन कराव. मृग नक्षत्रातल्या येणाऱ्या सरी काही काळ अंगावर झेलून निसर्गाचा आनंद लुटावा. अशी त्यावेळची परिस्थीती होती.
कधी कधी त्या पावसाकडे डोळे लावून बसायचे. बरसणारा पाऊस अन वैशाखातल्या उन्हाळाची आठवण करत रडवणारा पाऊस देखील पहावयास मिळायचा. पाऊस सगळ्यांना हवाहवासा असतो. पण काहि वेळा तो नकोसा होतो. पाऊस अधिक झाला तर ओला दुष्काळ, पाऊस नाही झाला तर दुष्काळच दुष्काळ अस सार दुखः साऱ्यांनाच सोसाव लागत. तरीही हा रूसणारा पाऊस अन दडलेला पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा असतो.
पाऊस पडणार, धन धान्य होणार, समृद्धी येणार अशा भाकीतावर अवलंबून असणारे ग्रामिण लोककलेतील अंदाज सांगणारे कलाकार आता नाहिसे होवू लागले आहेत. नंदीबैलवाले, कडकलक्ष्मी, पिंगळा,वासूदेव, बहुरूपी यांनी अंदाज सांगावा अन बळीराज्याने समाधान व्यक्त करावे. पण हे भाकीत सांगणारे कलाकार देखील नाहिसे होत चालले आहे. बदलत्या हवामानामुळे भल्या भल्यांचे अंदाज देखील चुकीचे ठरू लागल्याने पाऊस नेमका कुठे दडलाय की रूसलाय असेच म्हणावे लागेल.