दौंड : पावसाचे आगमन झाल्यानंतर अनेक रस्त्यांवर पाणीच-पाणी दिसत आहे. तसेच चेंबर देखील तुंबल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे. पावसाच्या आधी पालिकेकडून चेंबर साफ करण्यात आले असले तरी देखील चेंबरांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. दौंड शहरातून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दौंडकरांना तुंबलेल्या चेंबराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी नागरिकांकडून सातत्याने नगरपालिकेकडे तक्रारी देखील करण्यात येत आहेत. पण तरीही दौंडकरांचा हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
शहरातील भाजी मंडई, हिंदू स्मशानभूमी, चैतन्य मारुती मंदिर, मुस्लिम दफनभूमीला जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबल्याने त्यातील घाण पाणी आता रस्त्यावर वाहत आहे. ज्यामुळे नागरिकांना रोज त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नाही तर, घाण पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जावी लागत आहे. ज्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याविरोधात मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलथे यांनी या घाण पाण्यातच बसून नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. नगरपालिकेने पावसाच्या आधी या चेंबरचे काम केले होते मात्र, या चेंबरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. नेहमीप्रमाणे रस्त्यांवरून घाण पाणी वाहतच आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाण वास तसेच घाबाहेर पडायला नागरिकांना त्रास होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. अशातच नगरपालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी कुलथे यांनी केली आहे.







