राहुलकुमार अवचट
यवत : दौंड शहरात ८ एकर जागेमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य दौंड तालुका क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी आमदार राहुल कुल यांनी केली. दौंड शहर व तालुक्यातील खेळाडूंना सुस्सज क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून, दौंड येथे क्रीडा संकुलासाठी ८ एकर जागा, बांधकामासाठी सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी तसेच क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीसाठी सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये निधी आमदार राहुल कुल यांनी उपलब्ध करून दिला आहे.
सद्यस्थितीत संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेल्या निधीमधील पहिल्या टप्प्यात क्रीडा संकुलाच्या जागेचे समपातळीकरण करणे, ४०० मीटर धावण्यासाठी मार्ग तयार करणे व कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल अशी विविध मैदाने तयार करण्यासाठीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार राहुल कुल यांनी दिल्या. या वेळी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले आदी मान्यवर उपस्थित होते.