लोणी काळभोर, ता. १६ : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसांत छडा लावत लोणी काळभोर पोलिसांनी तिला तडीपार सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून सुखरूप सोडवले आहे. शेवाळवाडी परिसरातील एका लॉजवर सोमवारी (ता.१५) मध्यरात्री छापा टाकत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या धाडसी कारवाईमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुभम संजय धुमाळ (वय २६, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदिराजवळ, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ४३ वर्षीय वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची येथील १६ वर्षीय मुलगी घरात सर्व सदस्य उपस्थित असताना शुक्रवार (ता. ५ जून) रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. मुलगी बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे चौकशी करूनही तिचा काहीच मागमूस न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तपासात मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही शुभम धुमाळ याने तिच्या अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेत तिला पालकांच्या कायदेशीर ताब्यातून फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम धुमाळ हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल असून, त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती. मात्र, कायद्याचा धाक न बाळगता तो पुन्हा परिसरात सक्रिय झाल्याचे तपासात समोर आले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे यांचा वापर करून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, पोलीस हवालदार अण्णा माने आणि पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांना एका खबऱ्यामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी शुभम धुमाळ हा नाव बदलून शेवाळवाडी (ता. हवेली) येथील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
पोलिसांच्या पथकाने शेवाळवाडीतील संबंधित लॉजवर छापा टाकला असता, आरोपी शुभम धुमाळ आणि अल्पवयीन मुलगी एकत्र आढळून आले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या शुभम धुमाळ याला मंगळवारी (ता. १६) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.
हि उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कारवाई केली. अल्पवयीन मुलीची अवघ्या दहा दिवसांत सुखरूप सुटका करून आरोपीला जेरबंद करण्यात यश आल्याने लोणी काळभोर पोलिसांच्या दक्षतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.







