लोणी काळभोर, ता. 21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यथार्थ योग स्टुडिओतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा तसेच ‘प्रेरणा पुरस्कार 2026’ सोहळा शेवाळवाडी (ता. हवेली) येथील रामानंद हॉटेलमध्ये शनिवारी (ता.19) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध सर्जन डॉ. आनंद राईलकर, क्रिकेट प्रशिक्षक संदीप हिरेमठ, आयुर्वेदिक मेडिसिन एम.डी. डॉ. धनश्री दांडगे आणि शितीज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका उमा माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

सूर्यनमस्कार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल आणि उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गोल्ड मेडलचे मानकरी शैलेंद्र काळभोर, सायली काळभोर, सचिन सरोदे आणि प्रियांका कुतवळ ठरले. तर सागर बहिरट, गौरी कचरे आणि वर्षा कदम यांनी सिल्व्हर मेडल पटकावले. वंदना काळभोर आणि वंदना चव्हाण यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंजली राईलकर यांना ‘प्रेरणा पुरस्कार 2026’ देऊन शितीज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका उमा माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी योग, सूर्यनमस्कार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. योगाच्या माध्यमातून निरोगी व सकारात्मक समाज घडविण्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. कार्यक्रमाला स्पर्धक, पालक, योगप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कोलते यांनी केले. विकास कास्पे यांनी मनोगत व्यक्त केले, तर यथार्थ योग स्टुडिओच्या संस्थापिका शिल्पा कोलते यांनी उपस्थितांचे आभार मानले.







