लोणी काळभोर, ता. २९ : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आणि प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत समाजाला “नशामुक्त भारत, सुरक्षित डिजिटल भारत” असा संदेश दिला.

लोणी काळभोर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम स्कूल येथे सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत आयोजित कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच मोबाईलच्या योग्य आणि जबाबदारीने वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्याचे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम याविषयीही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमानंतर अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी इंग्लिश मीडियम स्कूल येथून सुरू होऊन श्री दत्त मंदिर चौक, खोकलाई देवी चौक, बिग बाजार चौक, श्री गणेश चौक, मारुती मंदिर चौक, सावता माळी चौक, रामदरा रोड, लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि सरकारी रुग्णालय मार्गे पुन्हा शाळेच्या परिसरात संपन्न झाली.
प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी “अंमली पदार्थांना नाही म्हणूया”, “नशामुक्त समाज घडवूया” अशा घोषणा देत परिसरात जनजागृती केली. या उपक्रमात शाळेतील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पोलीस अधिकारी-अंमलदार सहभागी झाले.
या कार्यक्रमास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक मुंडे, शाळेच्या प्राचार्या शेवाळे मॅडम, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी लोणी काळभोर पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः युवकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आणि मोबाईलचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले.







