पुणे: पुणे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून मंगळवारी, 29 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यात भव्य ‘महाकुंभ रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विविध नामांकित कंपन्या आणि संस्थांमध्ये शेकडो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांना सहज सहभागी होता यावे, यासाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रोजगार मेळाव्याची केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पुणे शहर परिसरात COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ या ठिकाणी मेळावा होणार आहे.

ग्रामीण भागातील उमेदवारांसाठीही विविध केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नरमध्ये जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मावळमध्ये इंद्रायणी महाविद्यालय, इंदापूरमध्ये विठ्ठलराव थोरात खासगी ITI, दौंड आणि खेडमध्ये शासकीय ITI, मुळशीमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, शिरूरमध्ये कौशल्य विकास केंद्र, बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि आंबेगावमध्ये शासकीय पॉलिटेक्निक, अवसरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा दिलेल्या Google Forms लिंकवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी जाताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि अद्ययावत बायोडाटा सोबत ठेवावा.
अधिक माहितीसाठी रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधता येईल. यासाठी 020-26133606 या क्रमांकावर माहिती घेता येणार आहे.






