लोणी काळभोर, ता. 27 : पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या कारवाईत टोळीप्रमुखासह चार जणांवर मोक्का कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

14 जून 2026 रोजी मध्यरात्री सुमारे अडीच वाजता पंचशीलनगर, येरवडा येथील दयावान समाज मंदिरासमोर फिर्यादी उमेश मंगलदास गायकवाड व त्यांचा मित्र यांच्यावर शोएब रशीद कुरेशी (वय 26 ), राज मुकेश सरवदे (वय 21 ), हुसेन अस्लम खान (वय 21 ) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच क्रिमिनल अॅमॅन्डमेंट अॅक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान शोएब रशीद कुरेशी हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याने अन्य आरोपींसोबत गुन्हेगारी टोळी तयार करून वारंवार गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याच्या कलमांचा अंतर्भाव करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

अखेर 26 ऑगस्टला मोक्काची मंजुरी
या प्रस्तावाला 26 ऑगस्ट 2026 रोजी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी मंजुरी दिली. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) 1999 मधील कलम 3 (1)(ii),3 (2) आणि 3 (4) चा अंतर्भाव करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात शोएब रशीद कुरेशी, राज मुकेश सरवदे आणि हुसेन अस्लम खान यांना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षग्रस्त बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोक्का कायद्याच्या कारवाईमुळे विश्रांतवाडी, येरवडा परिसरात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, तपास पथक प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल उगले यांच्यासह सर्व्हेलन्स व तपास पथकातील पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. मोक्का कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा ‘मोक्का’चा फास आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे.







