मावळ: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात (Maval News) गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. धरणात बुडून 24 वर्षीय ऋतिक कैलास साखरे यांचा मृत्यू झाला. पर्यटनासाठी मित्रांसोबत आलेला हा तरुण काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे काळाच्या पडद्याआड गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक आणि त्याचे मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. निसर्गरम्य वातावरण, धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि सुट्टीचा मूड या सगळ्यात त्यांनी धरणाजवळ वेळ घालवला. दरम्यान, पोहण्यासाठी ऋतिक पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने तो हळूहळू खोल भागात गेला. काही क्षणांतच तो बुडू लागला. मित्रांनी आरडाओरडा करत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ऋतिकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पवना धरण परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र पाण्याची अनिश्चित खोली, अचानक बदलणारा प्रवाह, घसरडा काठ आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात अशा घटना वाढताना दिसतात.







