युनूस तांबोळी
शिरूर(पुणे) : ‘घोणस’ या अतीविषारी सापाचा मिलन काळ सुरू होत आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो रात्रीच्या वेळी दिसणारा हा साप दिवसाही घराच्या आसपास किंवा शेतांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्तच्या संख्येने दिसू शकतो. असे सर्पमित्र शेरखान शेख यांनी सांगितले.
पुढे बोलताना शेख म्हणाले की, मिलनाच्या काळात सापाची मादी एक विशिष्ठ वास सोडते, या वासाचा पाठलाग करत एकावेळी अनेक नर त्या मादीच्या पाठीमागे येतात. यामुळे नरांमध्ये भांडण सुरू होतात, भांडणात एकमेकांना चावण्याची परवानगी नसते. फक्त एकमेकांना वेटोळे घालून खाली पाडणे आणि दमवणे असे हे भांडण असते. आणि शेवटी यामध्ये जो नर विजयी होतो त्याला मादी सोबत मिलनाची संधी मिळते.
एवढंच की घरांच्या आसपास लाकडांमध्ये, दगडांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी हे साप दिसतात. आणि लोक एकच साप आहे असं समजून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुसरा साप असल्याची कल्पना नसल्याने व तिकडे दुर्लक्ष असल्याने सर्पदंश होण्याची शक्यता असते. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास साप चावलेला अवयव किंवा जीव ही जाण्याची शक्यता असते.
साप दिसल्यास वनविभागाशी किंवा सर्पमित्राशी संपर्क साधा
साप निदर्शनास आला तर तात्काळ जवळच्या वनविभागाशी किंवा सर्पमित्राशी संपर्क साधा. साप मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मागील काही वर्षांपूर्वी शिरूर तालुक्यात तीन लोकांवर साप मारल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. अशा गुन्ह्यासाठी 7 वर्षाची शिक्षा आहे.
यामुळे गमवावा लागला होता डोळा
काही वर्षांपूर्वी इस्लामपूर येथे घोणसाच्या तोंडावर काठीने मारल्यामुळे त्या सापाची विषाची पिशवी फुटून त्यातील विष डोळ्यात उडल्यामुळे एका व्यक्तीला आपला एक डोळा गमवावा लागला होता. हेच विष जर आपल्या शरीरावरील ताज्या जखमेवर उडले तरी मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे साप मारणे टाळा व सर्पमित्रांना बोलवून साप व तुम्ही स्वतःही सुरक्षित रहा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.