पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून जिल्हा प्रशासनाने यासाठी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी सुमारे 38 टक्के जमीन अधिग्रहित करण्याचे काम सुरू असून 15 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये एकूण 1,216 हेक्टर म्हणजेच सुमारे 3,040 एकर जमिनीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी सुमारे 1,152 जागांसाठी प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाली आहेत. प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्रत्येक शेतकऱ्याला 1.61 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो. मात्र जमिनीवरील घरे, फळबागा, बोअरवेल, पाइपलाईन आणि इतर सुविधा लक्षात घेता काही ठिकाणी ही रक्कम 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे 500 कोटी रुपये जारी केले आहेत. उर्वरित निधी लवकरच जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला जाणार आहे. संमतीपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
या विमानतळ प्रकल्पात पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी या गावांचा समावेश आहे. 10 जूनपर्यंत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडातील 10 टक्के जमीन परतावा म्हणून देण्याचे नियोजन आहे.
पुरंदर विमानतळाशेजारी 245 हेक्टरवर अत्याधुनिक एरोसिटी उभारली जाणार असून या प्रकल्पासाठी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे विमानतळावरील ताण कमी होण्यासोबतच आयटी, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.







