पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या मृत्यूप्रकरणी राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोड फुटणार आहे.मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे, आजपर्यंत त्यांनी दान केल्याच कधी कोणी पाहिला आहे का? समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशूरता फारशी दिसून आलेली नाही अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनीषा भिसेचा मृत्यू रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात चौफेर बाजूने टीका केली जात आहे. या मृत्युप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले,मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय योगदान दिलं? कला क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं, पण समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आली नाही.अशा प्रकरणांवर सरकारने लक्ष देऊन, गरिबांचे शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई केली पाहिजे,अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान मंगेशकर कुटूंब हे माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.आहे. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणी राज्य महिला आयोग ही आक्रमक झाला आहे. रुग्णालयाने स्वतःचीच समिती तयार करुन अहवाल सादर केला. मात्र यामध्ये त्यांनी मृत रुग्णांची वैयक्तिक माहिती जाहीर केली. यावरुन आता राज्य महिला आयोगाने रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे.