आंबेगाव : फेरफार नामंजुर होणेबाबत तसेच त्याच्या मंजुरीला हरकत असल्याचा अर्ज दिला होता. या अर्जावरून फेरफार नामंजुर होण्याकरिता १० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी व खाजगी इसम याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव येथील मंडल अधिकारी कार्यालयामध्ये आज (दि. ०७) केली.
श्रीधर भागचंद आचारी (वय ५२ वर्ष, मंडल अधिकारी, घोडेगांव, ता. आंबेगाव, जि. पुणे वर्ग-३) आणि निशांत तुकाराम लोहकरे (वय ३७ वर्ष, रा. मु. पो. घोडेगांव, ता. आंबेगांव, जि. पुणे) अशी रंगेहाथ पकडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी ६४ वर्षीय व्यक्तीने ०७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांनी फेरफार नामंजुर होणेबाबत तसेच त्याच्या मंजुरीला हरकत असल्याचा अर्ज दिला होता. या अर्जाची सुनावणी लोकसेवक श्रीधर आचारी यांचेकडे सुरु होती. त्याबाबत तक्रारदार हे श्रीधर आचारी यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे कार्यालयात काम करणारे खाजगी व्यक्ती निशांत लोहकरे यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे निशांत लोहकरे यांना भेटले.
त्यावेळी तक्रारदार यांच्या अर्जावरुन फेरफार नामंजुर होण्याकरिता श्रीधर आचारी मागतील त्याप्रमाणे पैसे द्या, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे लोकसेवक श्रीधर आचारी यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे फेरफार नामंजुर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक श्रीधर आचारी यांनी तक्रारदार यांचेकडे वरील काम करण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तक्रारदार यांचेकडून ५ हजार लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. तसेच निशांत लोहकरे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देणेबाबत प्रोत्साहन दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांचेविरुद्ध घोडेगांव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.