बारामती: बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ (Kishor Masal) यांच्याविरोधात पक्षाने कठोर भूमिका घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आल्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Baramati News)

अलीकडेच सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या कथित संभाषणात किशोर मासाळ यांनी अजित पवार यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा दावा करण्यात आला. “अजित पवार मेला, त्याने मला फरक पडला नाही,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचे सांगितले जात असून, रुपाली पवार यांच्याबाबतही आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या ऑडिओनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.

या प्रकरणानंतर बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत मासाळ यांच्या विरोधात निषेध नोंदवला. अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर त्यांनी निवेदन सादर करून मासाळ यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याची मागणीही करण्यात आली.
वाढता वाद लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी किशोर मासाळ यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली. पक्षाच्या विचारधारेविरोधात आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील असे वर्तन मान्य केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.
मात्र, या संपूर्ण घडामोडींनंतरही किशोर मासाळ यांनी आपली भूमिका बदललेली नाही. त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास नकार देत, आपल्याविरोधात राजकीय हेतूने वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप केला. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपला राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण नगरसेवक पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात या वादाचे आणखी पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







