संतोष पवार
इंदापूर : सरपंच, शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी व शाळांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा पुरवून तालुक्यातील शाळा व अंगणवाडी आदर्श बनवण्याचे काम करा असा आदेश गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ग्राम पंचायत विकास आराखडा सरपंच व ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात गटविकास अधिकारी सचिन खुडे बोलत होते.
खुडे पुढे म्हणाले, सरपंचांनी गावातील अंगणवाडी, शाळांना पिण्याचे पाणी, शौचालय, खेळाचे मैदान व इमारती, सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत बाबी सुसज्ज करण्यासाठी त्यांचा विकास आराखड्यात समावेश करून त्या पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. सोबत तालुक्यातील प्रत्येक गावाला बगीचा सारखी स्मशानभूमी असावी, तालुक्यातील सर्व स्मशानभूमी देखील चांगल्या बनविणे गरजेचे आहे.
स्मशानभूमीत मनरेगा मधून झाडे लावून पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा व धार्मिक विधी करण्यासाठी कट्टे देखील बनविणे आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी खुडे यांनी आवर्जून दिल्या. आगामी काळात तालुक्यातील शाळा अंगणवाड्या व स्मशानभूमीचा चेहरा बदलणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी यशदा प्रशिक्षक रामदास पवार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत विकास आराखडे आदर्श करण्याबाबत मार्गदर्शन केले. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन होईल अशा कामांचा आराखड्यात मोठ्या प्रमाणात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी विस्तार अधिकारी शिवाजी काळे, भीमराव खोमणे, प्रशांत बगाडे, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक रामदास पवार, सहाय्यक शशिकांत करडे, सचिन पोतदार, अमोल राऊत आदिसह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.