पुणे: गणेशोत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. 1 ते 23 सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या या मोहिमेत 849 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 440 आस्थापनांना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान भेसळीचा संशय असलेला मोठा अन्नसाठा जप्त करण्यात आला. पुणे विभागात एकूण 46,266.02 किलो अन्नसाठा ताब्यात घेण्यात आला. या साठ्याची अंदाजे किंमत 1 कोटी 52 लाख 24 हजार रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सवात मिठाई, खवा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे या पदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यात आले. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे 672 नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले. राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभागातून मोठ्या संख्येने अन्न नमुने गोळा करण्यात आले.

गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांवर केवळ नोटिसांपुरती कारवाई न करता पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 69 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कलम 69 अंतर्गत 176 प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी 160 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 18.43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

राज्यातील कारवाईच्या तुलनेत पुणे विभागात सर्वाधिक सुधारणा नोटिसा देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच 160 प्रकरणे निकाली काढण्याची संख्याही राज्यात सर्वाधिक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.







