मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांना गणपती दर्शनाच्या वेळी एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर सुनीता आहुजा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली.

सुनीता यांनी कोलकाता येथील दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात,’माझं घर उद्ध्वस्त करणाऱ्या त्या राक्षसांचाही सर्वनाश होवो’ अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

आपल्या संदेशात सुनीता यांनी माध्यमांना या विषयाला अधिक प्रसिद्धी न देण्याचे आवाहन केले. त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे आपल्याला त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच तरुण पिढी आणि महिलांनी आपली बाजू समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, गोविंदा सध्या ‘रूपा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या सिनेमातून ते तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची माहिती आहे. कोमल राणी स्वर्णकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून गोविंदा आणि कोमल राणी यांना काही कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेल्याने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या. मात्र, या चर्चांबाबत विविध दावे केले जात असले तरी त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.






