न्हावरे: शिरूर तालुक्यातील दूध प्रक्रिया व्यवसायात मोठी खळबळ उडवणारी धडक कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. पारोडी (ता.शिरूर) येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीवर छापा टाकून तब्बल १२ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून, संबंधित कंपनीचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेली ही शिरूर तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मंगळवारी (ता.७) रात्री उशिरा पर्यंत कारवाई सुरू होती.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी केली असता,दूध साठवलेल्या टँकमधील दुधाचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी घेतले.नमुने तपासणीदरम्यान दुधामध्ये गुठळ्या आढळून आल्याने त्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचे प्राथमिक निरीक्षणात स्पष्ट झाले.त्यामुळे अन्न सुरक्षा निकषांनुसार टँकमधील संपूर्ण १२ हजार लिटर दूध तातडीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.

नष्ट करण्यात आलेल्या दुधाची अंदाजे किंमत सुमारे सव्वा पाच लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.याचबरोबर दुधाचे नमुने पुढील रासायनिक व वैज्ञानिक विश्लेषणासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतरच दुधामध्ये भेसळ, घातक रसायने अथवा मानवी आरोग्यास अपायकारक घटक आहेत की नाहीत,हे स्पष्ट होणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की,प्रयोगशाळेच्या अहवालात दुधामध्ये भेसळ किंवा आरोग्यास अपायकारक घटक आढळल्यास संबंधित कंपनी व कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, प्राथमिक तपासणीत दूध सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधित कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील दूध संकलन व प्रक्रिया उद्योगात मोठी खळबळ उडाली असून,इतर दूध प्रक्रिया केंद्रांवरही अन्न व औषध प्रशासनाची विशेष नजर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.त्यामुळे तालुक्यातील दूध उद्योगासह ग्राहकांचे लक्ष आता प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालाकडे लागले असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता वाढली आहे.







