इराण: जागतिक राजकारणात अमेरिका आणि इराणमधील वाद आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. बुधवारी रात्री अमेरिकेच्या हवाई दलाने आणि नौदलाने एकत्र येत इराणच्या प्रमुख लष्करी ठिकाणांवर भीषण बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यांमध्ये चाबहार, बुशहर, बंदर अब्बास, सीरिक आणि कोनारक या महत्त्वाच्या शहरांमधील इराणचे ड्रोन तळ आणि क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

या युद्धाचा थेट फटका भारतालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुवेतमधून तब्बल 20 लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारताकडे येणारे ‘लीला वादिनार’ हे जहाज होर्मुझ समुद्रधुनीजवळून ओमानच्या दिशेने माघारी फिरले आहे. सागरी सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळात भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठीच हा हल्ला केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, इराणनेही या हल्ल्यानंतर गप्प न बसता अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याचा दावा केला आहे. इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ने (IRGC) कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या 85 लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागले. यामध्ये अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लीट’ मुख्यालयावरही हल्ला करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. बहरीन आणि कतारसारख्या देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कुवेतच्या सुरक्षा यंत्रणेने इराणचे काही हल्ले हवेतच निकामी केले आहेत.
या सर्व प्रकारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा दिला आहे. “इराणने पुन्हा हल्ला धाडस केल्यास आम्ही 20 पट अधिक ताकदीने उत्तर देऊ,” असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. या मोठ्या लष्करी संघर्षामुळे सध्या संपूर्ण आखाती प्रदेशात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.







