पुणे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या नदीत मोठ्या प्रमाणावर साचलेल्या रासायनिक फेसामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या विषयावर विधानसभेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, नदीच्या दुरवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणांना धारेवर धरले.

विधानसभेत मुद्दे मांडताना आमदार कुल यांनी धक्कादायक आकडेवारी समोर ठेवली. पुणे परिसरातील नद्यांमध्ये दररोज सुमारे 800 MLD सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. इंद्रायणीसह मुळा-मुठा, भीमासह सर्व नद्यांच्या पाण्यातील BOD चे प्रमाण घातक पातळीपर्यंत वाढले आहे. पीएमआरडीएने 540 कोटी रुपयांचा पुनरुज्जीवन आराखडा तयार केला असला, तरी प्रत्यक्षात कामाचा वेग संथ असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नदीतील प्रदूषणाचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावरही होत आहे. उजनी धरणाच्या पाण्यातील मॅंगनीजचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा 51 पटीने अधिक आढळले असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ सौंदर्यीकरण नको, तर नद्यांचे प्रत्यक्ष पुनरुज्जीवन हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
केवळ कागदी नियोजनावर भर न देता, जलप्रदूषणाची रिअल-टाइम तपासणी करण्यासाठी ‘जीपीएस-बारकोड’ आधारित यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी सरकारला सांगितले. वारकऱ्यांच्या पवित्र वारीच्या वेळी इंद्रायणीचे स्वरूप दुषित असणे ही दुर्दैवी बाब असून, यावर शासनाने ठोस कृती करावी, अशी मागणी राहुल कुल यांनी केली आहे.






