पुणे: पुणे आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढते शहरीकरण आणि रस्त्यांवरील वाहनांची अफाट गर्दी यामुळे पुणेकरांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी आणि ठोस उपाय काढण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता या कामाला वेग देण्यासाठी शासनाने विशेष समित्यांची स्थापना केली आहे.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने दोन स्तरांवर समित्या नेमल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक ‘उच्चस्तरीय समिती’ काम करणार आहे. ही समिती प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी, धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक बाबींकडे लक्ष देईल. त्याचबरोबर, कामाची तांत्रिक अंमलबजावणी आणि वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘कार्यकारी समिती’ काम करेल.

समित्यांच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यामध्ये जमिनीखालून जाणारे बोगदे, उच्च क्षमतेचे सामूहिक वाहतूक मार्ग आणि बहुप्रतिक्षित ‘पुणे इनर रिंग रोड’ यांसारख्या मोठ्या कामांचा समावेश आहे. पुण्याचा समावेश जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत झाल्याने, या उपाय योजना केल्या जात आहे.
पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए (PMRDA) यांच्या समन्वयातून हे प्रकल्प मार्गी लावले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नियोजित पद्धतीने हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. यामुळे भविष्यात पुण्याचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे. निर्णयामुळे पुणे शहराचे भविष्य बदलण्यास मदत होईल.





