शिरूर: हजारो गुंतवणूकदारांना आर्थिक फटका देणाऱ्या गाजलेल्या सिस्पे इन्फिनिटी घोटाळ्याच्या तपासात अखेर मोठी आणि निर्णायक घडामोड घडली आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपींपैकी एक आणि कथित मास्टरमाइंड अकाउंटंट राहुल शामराव काळोखे याला इंटरपोलच्या माध्यमातून फिजी येथे अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यातून दूर राहिलेल्या आरोपीपर्यंत भारतीय तपास यंत्रणा पोहोचल्याने घोटाळ्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली असून,हजारो पीडितांच्या न्यायाच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध भागासह शिरूर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदार या घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात सापडले होते. या प्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू होते.

या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालय (अहिल्यानगर) , सीबीआय (दिल्ली) भारत सरकारचे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि इंटरपोल यांनी परस्पर समन्वय साधत व्यापक यंत्रणा उभी केली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पीडितांना न्याय मिळावा. फरार आरोपींना अटक व्हावी आणि तपासाला गती मिळावी यासाठी खासदार नीलेश लंके यांनी सातत्याने केंद्र व राज्यातील संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, अशी माहिती समोर आली आहे.

राहुल काळोखे याच्या अटकेनंतर त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार, निधीचा प्रवाह, संबंधित व्यक्तींची भूमिका, परदेशातील आर्थिक व्यवहारांची साखळी तसेच इतर आरोपींच्या सहभागाबाबत अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासाचा वेग वाढल्याने या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्याचे अनेक धक्कादायक पैलू उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कारवाईनंतर घोटाळ्यातील हजारो पीडितांनी समाधान व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. न्यायासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्यातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या प्रकरणातील प्रत्येक दोषीला कायद्यापुढे उभे केले जाईल, असा विश्वास पीडितांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी संबंधित सर्व तपास यंत्रणांचे आभार मानत, “सिस्पे घोटाळ्यातील प्रत्येक पीडिताला न्याय मिळेपर्यंत आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील,” अशी ठाम भूमिका व्यक्त केली.
आर्थिक विवंचनेच्या गर्तेत अनेक कुटुंबे……
अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी बँकांकडून कर्जे घेतली, तर काहींनी आपल्या आयुष्याची पुंजी असलेल्या जमिनी विकल्या. अनेकांनी नातेवाईक व पाहुणे मंडळींकडून उसने पैसे घेऊन गुंतवणूक केली होती. मात्र, घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली. आज अनेक कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबली असून, आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडलेल्या हजारो पीडितांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे.







