पुणे: लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय तलवारबाज तेजस मनोज पाटील याने भारतासाठी अभिमानाची कामगिरी केली आहे. नायजेरियातील लागोस येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील (यू-२३) राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद प्रतियोगितेमध्ये तेजसने रौप्यपदक पटकावले आहे.

9 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत तेजसने ‘वैयक्तिक फॉइल’ प्रकारात प्रभावी कामगिरी केली. विविध फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत त्याने थेट अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्याला सुवर्णपदकापासून थोडक्यात दूर राहावे लागले. मात्र, दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली.

तेजसच्या या कामगिरीमागे त्याचा आंतरराष्ट्रीय अनुभव महत्त्वाचा ठरला. यापूर्वी त्याने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई सिनियर फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘मेन्स फॉइल टीम’ प्रकारात भारतीय संघाने 8 वे स्थान मिळवले होते. या कामगिरीमुळे भारताला 2026 Asian Games साठी पात्रता मिळवण्यात तेजसचे योगदान राहिले.

याशिवाय शांघाय (चीन) येथे झालेल्या ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप मध्येही तेजसने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धांमधून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग त्याला लागोस येथील राष्ट्रकुल स्पर्धेत झाला.
तेजसच्या या यशामुळे MIT-ADT विद्यापीठात आनंदाचे वातावरण आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरु डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह विद्यापीठातील इतर पदाधिकाऱ्यांनी तेजसचे अभिनंदन केले.
क्रीडा विभागाचे संचालक आणि छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त प्रा. पद्माकर फड यांनीही तेजसच्या कामगिरीचे कौतुक केले. या पदकामुळे तेजसच्या क्रीडा कारकिर्दीला आणखी मोठी दिशा मिळाली असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







