मुंबई : ठाणे शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट -5 आणि खंडणी विरोधी पथकाने प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत एका अज्ञात हेल्मेटधारी सहआरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

ही घटना 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पाच हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर पिस्तूलमधून सात राऊंड फायर केले. त्यातील चार गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणात पूर्णेकर यांच्या नातेवाईकांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे.

गुन्ह्याचा योग्य तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया पकडला गेल्यामुळे आता या हत्येमागचे गूढ आणि नेमका कट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत काही वाहने जप्त केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दुसरीकडे, शहरातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचे जाळे आणि या हत्येच्या निषेधार्थ विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 9 ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत एका शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व प्रमुख पक्ष एकत्र येऊन भाग घेणार आहेत.







