सोलापूर : जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील करंजे गावचे अल्पभूधारक शेतकरी संतोष सिताराम लावंड (वय 50) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सततची दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतातून काहीच उत्पन्न न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. चालू हंगामातील दुष्काळाच्या सावटामुळे घडलेली तालुक्यातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष लावंड यांच्याकडे अवघी एक एकर शेती होती. यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे खरिपाचे पीक करपून गेले आणि शेतातील सर्व मेहनत वाया गेली. वाढते कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शासनाकडून वेळेत न मिळालेली आर्थिक मदत यामुळे ते मागील काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. गुरुवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून घेतला. त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात “पिकांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे मी आत्महत्या करत आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,” असा उल्लेख आहे.

सीना नदीकाठच्या करंजे भागात गेल्या वर्षी पुराचे संकट आले होते, तर यंदा तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत सरकारी मदत न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. प्रशासनाने कागदी सोपस्कार न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट मदत जमा करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर करंजे येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस हवालदार अशपाक शेख आणि भाऊराव शेळके पुढील तपास करत आहेत. संतोष लावंड यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.







