नाशिक : कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वृद्धाश्रम उभारण्याच्या नावाखाली एका व्यक्तीकडून भूखंड खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप अशोक खरातवर आहे. खरेदी केलेला भूखंड वृद्धाश्रमासाठी न वापरता आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पुढील तपासासाठी पोलिसांनी आपले हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.त्याचा विचार करून पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली आहे.

अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. केवळ नाशिकच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातही त्याच्यावर विविध गुन्हे नोंदवले गेले आहेत. यातील 12 प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यासोबतच बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणाचा तपास ‘ईडी’मार्फत सुरू आहे.

फसवणुकीशिवाय त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचेही गंभीर गुन्हे दाखल असून, या प्रकरणांवरील पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विविध न्यायालयांत सुरू असलेल्या या कायदेशीर कारवाईमुळे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागले आहे.






