विजय लोखंडे
पुणे : लोणीकंद (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालू वर्षी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी वाढल्याने अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत होते. त्या अनुषंगाने शाळा दोन सत्रांत सुरु करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसिसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांना प्रस्ताव पाठविला. त्यास प्रदीप कंद यांच्या पाठपुराव्यामुळे त्वरीत मंजुर मिळाली आहे. त्यानुसार येत्या सोमवारी १५ जुलै पासून शाळा दोन सत्रांत सुरु होणार आहे.
लोणीकंद (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पटसंख्या १८१६ इतकी असून ३५ शिक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच चाललेली आहे वाढत चाललेल्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वर्गखोल्या व शिक्षक अपुरे पडत होते. त्यामुळे दरवर्षी हा प्रश्न भेडसावत होता. तसेच असंख्य विद्यार्थी प्रवेशसाठी प्रतीक्षेत होते. सध्या एका एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आहेत.
शाळा दुबार सत्रात झाल्यास हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. त्यासाठी शाळा दोन सत्रात घेण्याबाबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांना प्रस्ताव पाठविला. त्यानुसार पंचायत समितीने सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पुणे मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे मंजुरीस पाठविला होता. त्यानुसार प्रदीपदादा कंद यांनी पाठपुरावा करून त्वरीत मंजुर करून घेतला.
शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग असून माहे एप्रिल २०२४ ची पटसंख्या १६६० इतकी होती. जून २०२४ ची पटसंख्या आजपर्यंत १८१६ झालेली असून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी संख्या जास्त आहे. तसेच मंजूर शिक्षक संख्या मुख्याध्यापक -१, पदवीधर ६, उपशिक्षक-३१ एकूण ३८ अशी असून सध्या पदवीधर-१, उपशिक्षक – ४ पदे रिक्त आहेत वर्ग खोल्यांची संख्या जि.प.मालकी- ३४, ग्रामपंचायत -०२, इतर ०२ अश्या एकूण ३८ आहेत. इयत्ता १ ली ते ७ वी च्या प्रत्येक तुकडीत ६० ते ७० विद्यार्थी संख्या असल्याने नवीन प्रवेश देण्यास अडचण निर्माण होत आहे.
या वर्षी ८०० विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तसेच शिक्षक संख्या वाढवून तसेच शासनाचे नियमानूसार अभ्यासक्रमाच्या सर्व तासीका पुर्ण होतील. या अटीवर शाळा दोन सत्रात भरविण्याच्या अटीवर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांनी शाळा दुबार सत्रात सुरु करण्यास परवानगी दिल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री अनुसे यांनी माध्यमांना दिली.