लोणी काळभोर, ता. 14 : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा (ता. हवेली) चौकात भरधाव कारने धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत चालक व त्याच्या साथीदारांनी “तू बीड-बार्शीतला आहेस, तुला काय भरपाई देऊ?” असे म्हणत एकट्या चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य चालकासह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कार चालक सोहम नितीन यादव (वय 30, रा. भोसरी) व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्रिंबक नारायण कांबळे (वय 34, रा. कोलवडी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्रिंबक कांबळे हे कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. 3 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता ते आपल्या मारुती सुझुकी झेन (MH20U6300) कारने कुंजीरवाडीहून कोलवडीकडे जात होते. थेऊर फाटा चौकात सिग्नलला थांबले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (MH14LE5575) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर संबंधित कारमधून उतरलेल्या चालकाने सुरुवातीला “गाड्या साईडला घेऊ आणि नुकसान पाहू” असे सांगितले. मात्र, काही क्षणातच कारमधील चार ते पाच इसम खाली उतरून कांबळे यांच्याशी वाद घालू लागले. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. चालक सोहम नितीन यादव याने “तू बीड-बार्शीतला आहेस, तुला काय भरपाई देऊ?” असे म्हणत शिवीगाळ केली आणि कानाखाली मारहाण केली. त्यानंतर इतर साथीदारांनीही मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
घटनास्थळी उपस्थित ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कांबळे यांना वाचवले. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने परिस्थिती चिघळली. त्यानंतर 112 वर कॉल केल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सोहम यादव व त्याच्या अन्य चार अनोळखी साथीदारांविरुद्ध मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 119, 177, 184, 185 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 125, 189(2), 190, 191(2), 281, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






