लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसर, मुंडवा, खडक, सासवड व पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या फुरसुंगी येथील अट्टल चोरट्याला अटक करण्यात आले आहे. ही कामगिरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्र.२ च्या पोलिसांनी मंगळवारी (ता. ०९) केली आहे.
यश संतोष झेंडे (वय १९, नारायण नगर, शिवशंभु शाळेजवळ, फुरसुंगी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९ गुन्ह्यांची उकल करून सुमारे ४ लाख २० हजार रुपयांच्या ९ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ मधील पोलीस कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव यांना दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा यश झेंडे याने चोरी केल्या आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी यश झेंडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केल्या आहेत. अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. आरोपीकडून ४ लाख २० हजार रुपयांच्या ९ दुचाकी जप्त करून ९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्र.२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, ज्ञानदेव गिरमकर, सुदेश सपकाळ, शिरीष गोसावी, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली आहे.