लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औताडेवाडी परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 5 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
हि कारवाई गुरुवारी (ता. 16) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास औताडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारे मळा परिसरात केली आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
विकी भगवंत विनावत (वय-36), रा. सातवनगर, गणपती मंदीराजवळ मोहम्मदवाडी, हडपसर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सत्यवान तुकाराम चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औताडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारे मळा परिसरात विकी विनावत हा विषारी गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता दोन मोठ्या खडयांमध्ये एकुण 12 हजार 500 लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, 17 हजार 500 रुपयांची 175 लिटर तयार दारू, असा 5 लाख 17 हजारांचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, आरोपी विकी भगवंत विनावत याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.