लोणी काळभोर, ता. 10 : मित्रासोबत जेवणासाठी गेलेल्या जिम ट्रेनरची (Loni Kalbhor News) पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर (Pune Crime) वस्ती परिसरातील शेल पेट्रोल पंपाजवळील कानिफनाथ ऑटो गॅरेजसमोर 3 मार्चला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी सुहास बाळासाहेब तिखे (वय 31, व्यवसाय – जिम ट्रेनर, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास तिखे यांनी सन 2017 मध्ये स्वतःच्या वापरासाठी यामाहा कंपनीची एफझेड 2.5 मॉडेलची काळ्या रंगाची दुचाकी (आरटीओ क्र. MH 12 PE 3000) खरेदी केली होती. तिखे यांनी त्यांची दुचाकी बोरकर वस्ती येथील शेल पेट्रोल पंपाजवळील कानिफनाथ ऑटो गॅरेजसमोर पार्क केली. त्यानंतर ते मित्र सागर राम वालीचा यांच्या चारचाकी गाडीत बसून लोणी टोलनाका येथील ‘हॉटेल रेड्डीज’ येथे जेवणासाठी गेले.

जेवण करून रात्री सुमारे 11 वाजता ते परत पार्किंगच्या ठिकाणी आले असता, सुहास तिखे यांना त्यांची दुचाकी तेथे आढळून आली नाही. त्यांनी परिसरात चौकशी केली असता, तेथील रहिवासी हिराबाई वालीचा यांनी सांगितले की, रात्री सुमारे 10.15 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 वर्षे वयाचा एक अनोळखी इसम तेथे आला होता. त्याने मोटारसायकलचे तोंड पुणे–सोलापूर महामार्गाच्या दिशेकडे वळवले आणि “मला पंढरपूरला जायचे आहे, मी येथे थोडा वेळ झोपतो,” असे सांगितले.
दरम्यान, तिखे यांनी परिसरात व दुसऱ्या दिवशी दिवसभर लोणी काळभोर व थेऊर फाटा परिसरात आपल्या दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकीचा काहीही मागमूस लागला नाही.चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे 30 हजार रुपये आहे. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






