लोणी काळभोर : संशयास्पद हालचाल करत बँकेच्या (Loni Kalbhor News) भिंतीच्या आडोशाला लपून बसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरातील माढेश्वरी बँकेच्या परिसरात मंगळवारी (ता.10) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास केली आहे. संभाव्य गुन्ह्याच्या तयारीत असतानाच, लोणी काळभोर पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. (Pune Crime)
संकेत किरण घोरपडे (वय 22, रा. पेटकरवस्ती, कुंजीरवाडी) आणि राज लक्ष्मण कांबळे (वय 22, रा. कवडीपाट टोलनाका परिसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार सूरज किरण कुंभार यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक सराईत गुन्हेगार तसेच पाहिजे असलेल्या आरोपींच्या तपासासाठी गस्त घालत होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तसेच पोलीस कर्मचारी अशोक भागवत गिरी यांचा समावेश होता. गस्त घालत असताना पोलिसांना 11 मार्च रोजी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास गुजरवस्ती परिसरातील माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को.ऑप. बँक परिसरात अंधारात दोन इसम भिंतीच्या आडोशाला संशयास्पदरीत्या लपून बसलेले दिसले.
पोलिसांनी वाहनाचे हेडलाईट टाकून पाहणी केली असता दोघेही आपले अस्तित्व लपवून बसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना पकडून त्यांची चौकशी केली. या ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता दोघांनीही उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. संशय अधिक बळावल्याने लोणी काळभोर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत हे दोघे दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोन्ही तरुणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 122 अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे संभाव्य गुन्हा वेळेत उधळला गेला असून परिसरात पोलिसांची गस्त अधिक कडक करण्यात वेळ आली आहे.







