लोणी काळभोर, ता. २४ : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या ‘हिट अँड रन’ अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहे. अपघातानंतर जखमींना मदत न करता वाहनचालक पसार झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नागेश राहुल निकम (वय १८) व अनिकेत सूर्यकांत पिठे (वय २८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही प्रकरणांत अज्ञात वाहनचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना कवडीपाट टोलनाका परिसरातील महादेव स्वीट होमसमोर घडली. या प्रकरणी वाल्मीक भारत जाधव (वय ३५, रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा चुलत भाऊ नागेश निकम याचा १८ जून रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या नागेशला प्रथम विश्वराज रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २१ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कोणतीही मदत न करता वाहनचालक फरार झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दुसरी घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिजाऊ मंगल कार्यालयासमोर पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. या प्रकरणी सूर्यकांत विश्वनाथ पिठे (रा. उरुळी कांचन) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा अनिकेत सूर्यकांत पिठे (वय २८) हा २२ जून रोजी त्याच्या ज्युपिटर दुचाकीवरून मित्राच्या लग्नासाठी हडपसरला गेला होता. दुपारी परत येत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला विश्वराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही प्रकरणांमध्ये अपघाताची माहिती न देता आणि जखमींना मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सलग घडलेल्या या दोन अपघातांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.







