Loni Kalbhor: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत गोळा केलेला कचरा लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आणून टाकला जातो. महापालिकेने लोणी काळभोरकरांच्या माथ्यावर मारलेल्या कचऱ्याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच महापालिकेच्या एका डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे 4 विजेचे खांब पडले आहे. तर एक रोहित्र जळाल्याची घटना घडली आहे. ही घटना वडाळे वस्ती परिसरात घडली असून शनिवारी (ता.8) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

दरम्यान, विद्युत खांब शेडवर पडल्याने शेतकऱ्यांच्या शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 5 तास विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या कचऱ्यामुळे विहिरींचे नैसर्गिक स्त्रोत खराब झाले असून पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग अडचणीत आला असून त्याने महानगरपालिकेच्या कचऱ्याला ठाम विरोध दर्शविला आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी स्वत:चा कोणताही प्रकल्प नसतानादेखील महानगरपालिकेचा कचरा येथे येतोच कसा. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महानगरपालिकेच्या कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा साचलेला आहे. या साठलेल्या कचऱ्यातील अन्नावर गाई, कुत्री व जनावरे ताव मारीत आहेत. मात्र प्लास्टिकयुक्त कचरा असल्याने तो सेवनामुळे जनावरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेचा कचरा टाकताना झालेले नुकसान भरपाई त्वरित द्यावी. तसेच हा दुर्गंधीयुक्त कचरा या भागात टाकण्यास मज्जाव करावा. आमचा या कचऱ्याला तीव्र विरोध असून याची प्रशासनाने दखल न घेतल्यास, याविरोधात तीव्र आंदोलन करणार आहे. असा इशारा वडाळे वस्ती परिसरातील नागरिकांनी दिला आहे. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत या कचऱ्याच्या संदर्भात काय भूमिका घेणार? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करण्यास जिल्ह्यात अग्रेसर
नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. असे वारंवार सांगून देखील नागरिक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत होते. त्यामुळे कदमवाकवस्ती गावामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून घनकचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार कचरावेचक घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. सध्यातरी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करण्यास जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.







