लोणी काळभोर, ता.०९ : लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे ५० ते ७० लाख रुपये निधी खर्चुन पाच वर्षापुर्वी उभारलेली पत्रा शेड पाडून, त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यास बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी स्वतःच्या हितासाठी आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून, त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्याचे नियोजन सुरु केले आहे. सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता व स्वत:च्या फायद्यासाठी मनमानी कारभार करीत असतील तर ग्रामस्थांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याबरोबरच, वरील निर्णया विरोधात कायदेशिर लढा उभारु असा इशारा हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिला आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून, त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शिवसेना कार्यालयात सोमवारी (ता.०९) सायंकाळी प्रशांत काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत काळभोर यांनी वरील इशारा दिला आहे.
यावेळी प्रशांत काळभोर यांच्या समवेत साधना सहकारी बॅंकेचे संचालक प्रताप बोरकर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राहुल काळभोर, सुनील गायकवाडसह पांडुरंग केसकर, नितीन जगताप, माऊली काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वरील विषयाबाबत बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. १३ येथे आठवडे बाजार असून त्या ठिकाणी अर्ध्या बाजारावर पात्र शेड उभारणी केली आहे. सध्या ती जागा आठवडे बाजारासाठी अपुरी पडत असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना त्याठिकाणी व्यापार करताना अडचणी निर्माण होतात. अशी परिस्थिति असताना सुद्धा लोणी काळभोर चे सरपंच सरपंच व इतर सदस्य मनमानी कारभार करून सदर सुस्थितीत असलेले आठवडे बाजार पाडून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्याचे नियोजन केले आहे. ही जागा आठवडे बाजारासाठी राखीव असून सध्याच्या बाजारास अपुरी पडत आहे. त्यामुळे ते बांधकाम पाडणे चुकीचे आहे. सुस्थितीत असलेले पत्र्याचे शेड पडल्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार आहे.
प्रशांत काळभोर अधिक बोलतांना म्हणाले, बाजारात येणारे शेतकरी, ग्राहक, व्यापारी व विक्रेते यांच्यासाठी पाच वर्षापुर्वी लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे ५० ते ७० लाख रुपये निधी खर्चुन पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. या पत्रा शेडचे आयुष्य़ किमान पंचविस वर्षे असतांना, ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी कारभार करीत असतील तर अशा निर्णयांना आमचा विरोध राहणार आहे.
आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून व्यावसायिक गाळे बांधण्यास ग्रामपंचायत सदस्य बकुळा केसकर, सविता जगताप, राहुल काळभोर व सुनील गायकवाड या चार विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. शासकीय मालमत्तेची नुकसान टाळण्यासाठी व बेकायदा व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी विरोध म्हणुन याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, हवेली गटविकास अधिकारी यांना दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी प्रशांत काळभोर यांनी केली.
दरम्यान प्रशांत काळभोर यांच्या आरोपाबद्दल बोलताना लोणी काळभोरचे विद्यमान सरपंच योगेश काळभोर म्हणाले, ग्रामस्थांच्या मागणीनुसारच दोन महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत आठवडे बाजार सुधारणा बाबत सखोल चर्चा झाली होती. या चर्चेत ग्रामस्थांनी सुचविल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी गाळे बांधकाम करण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीने वरील निर्णय घेतलेला आहे. याबाबत घेतलेला निर्णय़ ग्रामस्थांना समजावा यासाठी, त्याची प्रसिध्दीही करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामस्थांकडून विविध सूचना आल्याने, ग्रामपंचायतीने याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र आमच्याकडे ग्रामस्थांच्या आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे असेही योगेश काळभोर यांनी यावेळी स्पष्ठ केले आहे.