लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सुसाट आणि बेदरकारपणे धावणाऱ्या डंपर हायवाच्या भीषण धडकेत एका 56 वर्षीय पेंटर व्यवसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात हि घटना घडली अपघातानंतर धक्कादायक बाब समोर आली असून, धडक देणाऱ्या ‘त्या’ डंपरला पाठीमागून कोणतीही नंबर प्लेट नसल्याचे उघड झाले असून पोलीस आणि आरटीओ प्रशासनाच्या दुर्लक्षावर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मोहन जगन्नाथ माळवदकर (वय-56, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे या भीषण अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी पेंटर व्यवसायिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन माळवदकर हे लोणी काळभोर बाजूकडून काम आटपून आपल्या दुचाकीवरून गुजरवस्ती येथील घराकडे निघाले होते. महामार्गावरील कवडीपाट परिसराजवळ असणारा रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ओलांडत असताना,हडपसर बाजूकडून आलेल्या मातीने भरलेल्या डंपर हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, माळवदकर रस्त्यावर पडताच डंपरचे अवजड चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
या अपघातानंतर महामार्गावरील डंपर माफियांचा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर कारभार चव्हाट्यावर आला आहे. धडक दिलेल्या ‘त्या’ डंपरला फक्त पुढच्या बाजूला नंबर प्लेट लावलेली आहे, तर पाठीमागच्या बाजूला आणि इतर कुठेही कोणताही नंबर लिहिलेला नाही. अपघात झाल्यानंतर बघ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर विना नंबर प्लेटचे, ओव्हरलोड माती-वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या आणि आरटीओच्या नाकाखाली राजरोसपणे सुसाट धावत असतात. या डंपर चालकांवर कोणतीही कडक कारवाई केली जात नाही आणि त्यामुळेच रोज निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, असा संतप्त सवाल गुजरवस्ती आणि कवडीपाट परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.







