लोणी काळभोर : एकीकडे आपण स्वच्छ पुणे व सुंदर पुणे असे नारा देतो. मात्र त्याच पुण्याजवळील लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ठीग साचल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही गावांच्या परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती कचरा व्यवस्थापन करण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिरून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. वेगवेगळ्या मोहिमा राबवून जनजागृती केली जात आहे. मात्र, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्यालगत कचरा व घाण पडलेली आहे. तर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुर्गंधीयुक्त कचरा साठलेला आहे. या कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतची लोकसंख्या अंदाजे 50 ते 60 हजाराच्या आसपास आहे. तर लोणी काळभोरची ही लोकसंख्या तेवढ्याच आसपास आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी काही गाड्या कार्यरत आहेत. मात्र या गाड्यांचा केवळ दोन्ही ग्रामपंचायतींनी केवळ दिखावा केल्याचे समोर येत आहे. तर गावातील सर्व कचरा उचलण्यासाठी आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिमेच्या ६ कचरा गाड्या करीत आहेत. आणि या कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावत आहेत. मात्र लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अथवा कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व स्वतंत्र कचरा डेपोही नाही. त्याचबरोबर कचरा प्रक्रिया उद्योग केंद्र उभारण्यासाठी शासकीय जागासुद्धा उपलब्ध नाही.
कचऱ्याच्या विघटनाचे व्यवस्थापन ग्रामपंचायतींना शक्य होईल का?
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील काही उद्योजक कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना प्रशासनाकडून कोणताही ठोस सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याने कचरा विघटन प्रकल्पाकडे उद्योजकांची पावलं पुढे पडत नाहीत. तसेच स्थानिक गट तट विसरून शासनस्तरावर पाठपुरावा केल्यास कचऱ्याच्या विघटनासाठी राज्य सरकारकडूनही विशेष मदत मिळेल व परिसरातील शेतकऱ्यांना कमी किंमतीत कचरा खत उपलब्ध होऊ शकते. मात्र, यासाठी संकुचित वृत्ती न ठेवता प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवत प्रयत्न केल्यास हे साध्य होणार आहे. यासाठी वेळीच जनजागृती करण्याची आवश्यकता वाटत आहे.
ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचे काम एका खाजगी एजन्सीला दिला आहे. त्या एजन्सीने त्वरित काम सुरु करावे. एजन्सी जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा गोळा करण्यास सांगावे. नागरिकांना डस्टबिन उपलब्ध करून द्यावेत. तसेच गावाची स्वच्छता केवळ स्वच्छता अभियाना पुरती मर्यादित न राहता कायम स्वच्छता झाली पाहिजे.
नंदू काळभोर (माजी सरपंच, कदमवाकवस्ती, ता. हवेली)
कदमवाकवस्ती गाव कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यास सांगितले आहे. भगवा चौक व इंदिरानगर परिसर चकाचक केला आहे. काही ठिकाणी कचरा राहिला असेल तर तो ताबडतोब उचलण्यास सांगतो.
अमोल घोळवे (ग्राम विकास अधिकारी, कदमवाकवस्ती, ता. हवेली)
लोणी काळभोर येथील एमआयटी संकुलात मागील दोन दिवस कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे दोन दिवस कचरा उचलण्यात आलेला नाही. कारण कचऱ्याच्या गाड्यांना नदीजवळ असलेल्या जागेत जाऊन कचरा टाकण्यासाठी एमआयटीतून जावे लागते. आज गुरुवारी (३ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत गावातील सगळा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात येईल.
सतीश गवारी (ग्रामसेवक, लोणी काळभोर, ता. हवेली)