लोणी काळभोर, ता. 16 : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा (Loni Kalbhor) उंचावण्यासाठी आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पंचायत समिती सभापती, उपसभापती चषक व शिक्षक संघ चषक’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी ही घोषणा करत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी शिक्षकांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे आश्वासन दिले.

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड यांचा सत्कार समारंभ थेऊर येथे पार पडला. हवेली तालुका शिक्षक संघाच्या वतीने सभापती, उपसभापती यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी युवराज काकडे बोलत होते.
यावेळी हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,महिला आघाडी तसेच तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नुतन कार्यकारिणी सदस्यांची घोषणा यावेळी शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली. यावेळी सभापती व उपसभापती यांच्याहस्ते नव्या कार्यकारिणी सदस्यांना निवडपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी कायम शिक्षकांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन सभापती युवराज काकडे व उपसभापती विद्या गायकवाड यांनी दिले.
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी, जिल्हा परिषदेच्या ‘जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाच्या’ धर्तीवर, तालुका स्थरावरील शाळांना व शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘पंचायत समिती सभापती, उपसभापती चषक व शिक्षकसंघ चषक’ या चषकांची नव्याने घोषणा यावेळी करण्यात आली. तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेसाठी सभापती चषक व 25 हजार रुपये पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी उपसभापती चषक व 15 हजार रुपये पारितोषिक, तृतीय क्रमांकासाठी शिक्षक संघ चषक व 10 हजार रुपये पारितोषिक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
दरम्यान, या पुरस्कारांचे वितरण आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याचे सभापती काकडे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्व शाळांनी यात सहभागी होण्यासाठी, शाळेच्या सर्व शिक्षक बांधवांनी शाळांचा दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण याकडे प्रामुख्याने भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.







