पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची म्हणजेच ASDD मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या यादीमध्ये आपले नाव आहे का, याची तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन ASDD यादी पाहावी. आपले नाव चुकीने या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

एखाद्या मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने अनुपस्थित, स्थलांतरित, मयत किंवा दुबार मतदारांच्या यादीत टाकण्यात आले असल्यास संबंधित व्यक्तीला आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घेता येणार आहे. यासाठी मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदान केंद्रनिहाय BLO यांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांना आपल्या भागातील संबंधित अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. चुकीने ASDD यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांचे नाव आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केले जाईल.
जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीतील आपले नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक मतदाराने वेळेत तपासणी करावी. विशेष सखोल पुनरीक्षणामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यास मदत होणार आहे.







