विजय लोखंडे
सुदुंबरे : सुदुंबरे (ता.मावळ) येथील संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा लिहिली. त्यामुळे तिचा प्रसार झाला. त्यांचे स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुदुंबरे गावातील श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचं स्मारक अतिशय देखणं करू, हेरीटेजचा दर्जा देऊ, ६६ कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहेच. त्यासाठी निधी कमी पडला तर आणखी देऊ, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि.०४) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुदुंबरे गावात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, मावळचे आमदार सुनील शेळके, संत जगनाडे महाराज संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील तेली समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यामुळे तेली समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती होईल. तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी हे महामंडळ काम करेल. तसेच भर कार्यक्रमातच त्यांनी स्मारकाचं काम उत्तम करण्याचा ठेकेदाराला दम भरला.
पहिल्या टप्प्यात सुरुवातीला स्मारकासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला. त्यासाठी वास्तू विशारदाकडून मंदिराची रचना बनविली. त्यानंतर ६६ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जगनाडे महाराज यांचे स्मारक भव्यदिव्य करू.
सुनील शेळके,आमदार-मावळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुदुंबरे येथे जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ६६ कोटींचा मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने आता श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. तर अजितदादा यांनी राज्यातील तेली समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याने आमचा तेली समाज कायमच त्यांचा ऋणी राहील. याबद्दल अजितदादा पवार यांचे आम्ही संपूर्ण तेली समाजाच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत.
शिवदास उबाळे, अध्यक्ष-श्री संत संताजी जगनाडे महाराज संस्था, सुदुंबरे